गिर्यारोहकांचे जग खरतर चार भिंतीबाहेरचे, भटकंतीचे. चौकटीतल्या आयुष्यात ते कधीच बंदिस्त नसतात. पण ही भटकंती सुरू असते ती मात्र निसर्गाचा मान राखीत, त्याचे अलिखित नियम पाळीत, गिर्यारोहणातील सुरक्षेचे मूलभूत तत्व अंगी बाणवित.
महाराष्ट्रात गिर्यारोहकांच्या अनेक संस्था आहेत आणि हजारो गिर्यारोहक गिर्यारोहणाचा छंद जोपासत आहेत. या सर्वांना एकत्र आणणे, त्यांच्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करणे गरजेचे होते. त्यासाठी पुढाकार घेतला मुलुंडच्या महाराष्ट्र सेवा संघाने. गिर्यारोहकांशी झालेल्या संवादातून “गिरीमित्र संमेलनाची” संकल्पना पुढे आली. त्यासाठी सेवा संघाचे श्री. चंद्रशेखर वझे, श्री. रवींद्र लाड, श्री. डी व्ही कुलकर्णी, श्री अरुण भंडारे आणि प्रदीप नाटेकर आदी प्रभूतीनी सर्वोतोपरी सहाय्य केले.
पहिल्या गिरिमित्र संमेलनाचा आराखडा, रूपरेषा आखण्याचे काम सर्वश्री धनंजय मदन, प्रदीप केळकर, प्रशांत ठोसर, गिरीश जाधव, समीर परांजपे आदी मंडळींनी केले. डोंगरात विविध कारणांनी भटकंती करणा-या सर्वांसाठी उपयुक्त ठरतील असे सर्वसमावेशक कार्यक्रम करायचे ठरले. या सर्व संकल्पनांना आणि भटक्यांना एकत्र आणून संमेलनास मूर्त स्वरूप देण्यात श्री हृषीकेश यादव यांची भूमिका महत्वाची ठरली. दिशा ठरली आणि पहिल्या संमेलनाची मुहूर्तमेढ झाली.
दिनांक १४ जुलै २००२ रोजी डोंगरवेड्यांचे पहिले अनोखे संमेलन मूर्त स्वरूपात साकार झाले. संमेलनाची संकल्पना, आखणी, आयोजन सर्वांनी मिळून केले होते. परिसंवाद, दृकश्राव्य सादरीकरण, मुलाखत असे याचे स्वरूप होते. दुस-या संमेलनापासून एकेका गिर्यारोहण संस्थेला संमेलन आयोजनाची जबाबदारी देऊन संमेलनाचे यशस्वीपणे आयोजन होऊ लागले. त्यामुळे संमेलनात संस्थांचा सहभाग वाढला, संमेलनात वैचारिक विविधता आली आणि संमेलनाला कार्यकर्ते मिळाले. दरवर्षी संमेलनात काही ना काही नावीन्यपूर्ण उपक्रमांची भर पडत गेली. तिस-या वर्षापासुन गिर्यारोहण मोहिमा, गड-किल्ले, निसर्गावलोकन अशा विषयांच्या दृकश्राव्य सादरीकरणाच्या स्पर्धा होऊ लागल्या. या स्पर्धेमुळे गिर्यारोहणाचे, गड किल्ल्याचे डिजिटल दस्तऐवजीकरण होऊ लागले. गिर्यारोहण मोहिमा, सुळके आरोहण, गड किल्ल्यांवरील भटकंतीचे व्यवस्थित चित्रीकरण होऊ लागले. आजवर सुमारे १०० हून अधिक फिल्म्सचा या स्पर्धेत सहभाग झाला आहे.
चौथ्या संमेलनापासून तर मध्यवर्ती संकल्पनेचा आढावा घेणा-या फिल्म्स तयार होऊ लागल्या. गिर्यारोहणाच्या ५० वर्षाचा आढावा, सह्याद्रीची जीवनगाथा, सामजिक बांधीलीकी जोपासणा-या संस्थांच्या कार्याचा आढावा, महिलांचे गिर्यारोहण, सह्याद्रीतील प्रस्तरारोहणाचा आढावा असे विशेष दस्तऐवज यातून तयार झाले आहेत. त्यामुळेच गिर्यारोहण क्षेत्रातील आजवरच्या कामगिरीची काही प्रमाणात व्यवस्थित नोंद होऊ शकली. अशा विविध उपक्रमांमुळे संमेलनाची ख्याती सर्वदूर पसरली. अनेक मान्यवर व्यक्ती संमेलनास उपस्थितीस राहू लागल्या.
चौथ्या संमेलनापासून गिरीमित्र सन्मान प्रदान करण्यात येऊ लागले. गिर्यारोहण क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणा-या व्यक्ती व संस्थांचा गौरव होऊ लागला. गिरिमित्र जीवन गौरव, गिरीमित्र गिर्यारोहक सन्मान, गिरिमित्र गिर्यारोहक संस्थात्मक कार्य सन्मान, गिरीमित्र संस्था सन्मान, गिरिमित्र शरद ओवळेकर विशेष सन्मान, वर्षातील उत्कृष्ट गिर्यारोहक व प्रस्तरारोहक असे सन्मान देण्यात येऊ लागले.
पाचव्या संमेलनापासून छायाचित्रण स्पर्धादेखील घेण्यात येऊ लागल्या. दरवर्षी किमान ५०० छायाचित्रे यासाठी येऊ लागली. विविध माहितीपर पुस्तिका, नवीन उपक्रमांसाठी विशेष वेळ, खास डोंगर भटक्यांसाठी अनोपचारिक असे आदल्या दिवशी पूर्व संध्येचे आयोजन असे भरगच्च कार्यक्रम संमेलनात सादर होऊ लागले.
प्रत्येक संमेलनात, देश विदेशातील प्रथितयश गिर्यारोहक व विविध क्षेत्रातील मान्यवर यांना विशेष अतिथी म्हणून निमंत्रित करण्याचा प्रघात सुरु आहे. त्यांचे अनुभव व विचार यांनी गिरिमित्रांना समृद्ध केले आहे. त्यांच्यामुळे गिरिमित्र व्यासपीठाला मोठा सन्मान प्राप्त झाला आहे. तसेच त्यांच्या माध्यमातून गिरिमित्र संमेलनाची ख्याती देश विदेशात पोहोचण्यास मदत झाली आहे.
यंदा संमेलनाला २५ वर्षे पूर्ण होत आहेत. २५ वे गिरिमित्र संमेलन २०२८ मध्ये साजरे होईल. त्यासाठी जोरदार तयारी सुरु आहे. गिरिमित्र संमेलन यशस्वी करण्यात गेल्या २५ वर्षात अनेक संस्था व कार्यकर्त्यांनी बहुमोल योगदान दिले. त्यामुळेच गिरीमित्र संमेलन महाराष्ट्रातील गिर्यारोहकांचे, दुर्गप्रेमींचे एक हक्काचे व्यासपीठ बनले आहे. विशेष म्हणजे हे सर्व काम निस्वार्थी भावनेने, स्वत:च्या खिशाला खार लावून आयोजक संस्था व त्यांचे कार्यकर्ते मोठ्या जिद्दीने आणि उत्साहाने संमेलन यशस्वी करीत आले आहेत. त्यामुळेच महाराष्ट्र सेवा संघाच्या भक्कम पाठबळावर गिरिमित्र संमेलन देश विदेशात महाराष्ट्रातील गिर्यारोहणाचा ठसा उमटवत आहे.
श्री ऋषिकेश यादव (अध्यक्ष)
श्री किरण देशमुख (कार्यवाह)