इ-मेल:

mss_mulund@rediffmail.com

संपर्क क्र.

+88794 32328

अर्थपूर्ण अर्थ-कायदा विभाग




१६ वर्षे मागे वळून बघताना…………..

महाराष्ट्र सेवा संघ मुलुंड , संस्थेने काळाची पावले ओळखत २००९ साली आपला अर्थ विभाग सुरु केला.आर्थिक सजगता वाढवणे , आर्थिक शिस्तीचे महत्व पटवून देणे, आर्थिक नियोजन कसे उत्तम करता येईल , आर्थिक बाबतीतली काळजी कशी घ्यावी ह्या विचारांचा प्रसार करणे, आपल्या या उद्देशानुसार मागील सोळा वर्ष संघाचा हा विभाग कार्यरत आहे.
आर्थिक विश्वातील ताज्या घडामोडी, समस्या , गुंतवणूक – (रिस्क-रिटर्न अनालीसीस , नवनवीन साधने) , सोन्यातली गुंतवणूक ,बदलते व्याजदर आणि गुंतवणूक, म्यूच्युअल फंड ,आयकराच्या तरतुदी आणि आयकर विवरणपत्र विषयक माहिती, तरुण वयापासून आर्थिक नियोजन, विमा,सायबर गुन्हे, इच्छापत्र, जागतिक घडामोडी आणि भारतीय बाजारपेठ, अर्थसंकल्प (अपेक्षा आणि त्याचे विश्लेषण), औषधे आणि अर्थकारण, Entrepreneurship डेव्हलपमेंट, करियर गायडन्स, रीडेव्हलपमेंट, विजेचे अर्थकारण, सहकारी संस्था आणि आयकर तरतुदी आणि जी.एस.टी , डेरीवेटीव्हस बाजार ,अशा अनेक अर्थ विषयक विषयांवर आजवर व्याख्याने झाली.
अर्थ विभागाच्या आजवरच्या कार्यक्रमात अनेक उत्तम आणि तज्ञ वक्ते श्रोत्यांना मार्गदर्शक म्हणून लाभले,ज्याद्वारे त्यांनी त्यांचे अनुभव श्रोत्यांसमोर मांडले. प्रत्येकाला त्याच्या प्रमाणे अनुभव येईल अथवा फायदा अथवा तोटाही होईल असे नाही पण काय अनुकूल ठरू शकते आणि प्रतिकूलता कशी कमी करता येईल ह्यासाठीचे दिशा दर्शक मात्र ते नक्कीच ठरले. कारण ते अनुभव व्यवहार्य होते आणि अशा कार्यक्रमातून हळू हळू अर्थ विभागाने अनेक “अर्थ मित्र” जोडले.

ह्या मित्रांशी होणा-या देवाण घेवाणीतून कुठले विषय चर्चिले जाणे आवश्यक आहे याचा अंदाज येत गेला आणि त्यातून पूर्वी सर्व साधारणत: दोन महिन्यातून एक अशा होणा-या कार्यक्रमाऐवजी दर महिन्याला एक अशी कार्यक्रमांची मालिका असावी हा विचार पुढे आला ज्याद्वारे वर नमूद केल्याप्रमाणे अनेक विषय नियमितपणे आणि योग्य वेळी चर्चिले जातील. संकल्पना उत्तम होतीच पण “सोने पे सुहागा” म्हणतात त्याप्रमाणे महाराष्ट्र टाईम्स सारख्या अग्रणी दैनिकाने साथ द्यायची तयारी दर्शवली.आणि आता त्यामुळे जास्तीतजास्त लोकांपर्यंत पाहोचता येणे शक्य झाले आणि ज्या मूळ उद्देशाने अर्थ विभाग सुरु झाला तो उद्देश्य आधिक चांगल्या प्रकारे सफल करता आला. अर्थ प्रबोधन मालिकेचे १०० वे सत्र म्हणून एक अर्थ महोत्सव आयोजित केला होता ज्यात तरुण मराठी उद्योजकांचा सत्कार करण्यात आला. मानव संसाधन चे संस्थेतील अर्थकारणातील महत्व , Private equity फंडस् हे वेगळे विषय त्यात चर्चिले गेले, शेअर बाजार strategies वर परिसंवाद झाला.या अर्थ प्रबोधन मालिकेची आतापर्यंत ११९ सत्रे झाली आहेत.
सध्या अर्थ विभागातर्फ़े पाच सत्रांची ‘गप्पा उद्योजकांशी” हि मालिका सुरु आहे.त्यातील तीन सत्रात आतापर्यंत वीणा टूर्स च्या वीणाताई पाटील, चितळे बंधूंचे इंद्रनील चितळे ,पितांबरी प्रोडक्टस चे रवींद्र आणि परीक्षित प्रभुदेसाई यांच्या मुलाखती घेतल्या गेल्या. मटा चे वैभव वझे यांनी ह्या मुलाखती घेतल्या.

“कायदा”हा देखील आर्थिक बाबींशी अतिशय जवळचा विषय. अर्थ मालिकेतून कायदा विषयी देखील सत्र झाली आहेत. मालमत्ता हस्तांतरण,वाहने-वाहतूक कायदा, ग्राहकांचे अधिकार आणि जबाबदा-या, आजच्या इलेक्ट्रोनिक युगात फार दक्षता घेणे आवश्यक असलेल्या सायबर गुन्ह्यापासून योग्य ती खबरदारी कशी घ्यावी ह्याचे मार्गदर्शन देखील अर्थमित्राना मिळाले.

अर्थ विभागातर्फे शेअरबाजारशी संलग्न कार्यशाळा देखील घेण्यात आल्या. ज्यात कंपन्यांचे फंडामेंटल अनालीसीस, टेकनीकल अनालीसीस,हे विषय शिकवले गेले. अतिशय उत्तम प्रतिसाद ह्या कार्यशाळाना मिळाला.

अर्थ विभागाच्या मुकुटातला अजून एक मानाचा तुरा म्हणजे एक दिवसीय अर्थ-जत्रा (फायनान्स फेअर). त्यात चार निरनिराळ्या विषयांवर , नियमित उत्पन्न देणाऱ्या गुंतवणुका, असेट अलोकेशन , शेअरबाजारातील गुंतवणूक , आणि स्थावर मालमत्तेतील गुंतवणूक व्याख्याने झाली. अशा “सबकूछ” गुंतवणूक ह्या कार्यक्रमाने अर्थ विभागाने अर्थमित्रांची मोठी पुंजी जमा केली. त्याच प्रमाणें व्यवसायाच्या नवीन वाटा चोखाळणाऱ्या महिलांचा ,ज्यात वैमानिक, मोनोरेल चालक आणि भाषातज्ञ अशा वेगळ्या वाटेने जाणाऱ्या महिलांच्या मुलाखतीचा कार्यक्रम हा करियर निवडीच्या उंबरठ्यावर असणाऱ्या तरुणींना तो नक्कीच वेगळा विचार करायला प्रवृत्त करणारा होता

अर्थ विभागातर्फे ह्या १६ वर्षांच्या प्रवासात, सहा वर्षे एक अतिशय चांगला उपक्रम राबवला तो म्हणजे “गणेश केशव करंदीकर उद्योजक सन्मान”. मराठी माणूस मुख्यत्वे चाकरमानी आणि उद्योजकतेपासून दूर आहे असे काहीसे समीकरणच. पण ज्यांनी रिस्क घेऊन आपल्या उद्यमशीलतेने हा समज बदलवला आणि आपल्या क्षेत्रात सुयश संपादन केले अश्या प्रथम पिढीतल्या उद्योजकांचा सन्मान संस्थेतर्फे केला गेला. स्वतः यशस्वी उद्योजक असलेले श्री अजित करंदीकर यांनी ह्या पुरस्कारासाठी भरीव योगदान दिले आणि त्यांचे वडिलांच्या नावे हा पुरस्कार देण्यात आला.उद्यमशीलतेचा गौरव हा नक्कीच पुढील पिढीला प्रेरणादायी ठरला.

अर्थ मालिकेत येणाऱ्या श्रोत्यांना आम्ही नेहेमीच “ अर्थ मित्र “म्हणून संबोधतो. त्यामुळे व्यासपीठ आणि श्रोते ही भूमिका थोडी शिथिल होऊन एक छान परस्पर संवाद साधला जातो. अर्थमित्रांकडून सूचनाचे नेहमीच स्वागत असते. काही सत्रात प्रश्नोत्तरे देखील होतात. अर्थ विभागाच्या कार्यक्रमात संघाचे अध्यक्ष चंद्रशेखर वझे यांनी रचलेली अर्थप्रार्थना आम्ही म्हणतो. संघाच्या अर्थ विभागचे उद्दिष्ट त्यातल्या एका ओळीतून अतिशय छान प्रतीत होते. “पैसा ध्येय नसे म्हणुनी जपणे जाणीव सामाजिक” .अश्या ह्या अर्थ पूर्ण अर्थ-कायदा विभागाची उत्तरोतर प्रगती होवो आणि अधिकाधिक अर्थमित्र जोडले जाओत हीच सदिच्छा. 

श्री. प्रकाश सडेकर (अध्यक्ष)

श्री. विजय वैद्य, अमिता ठोसर (कार्यवाह)