इ-मेल:

mss_mulund@rediffmail.com

संपर्क क्र.

+88794 32328

कला विभाग

१९७७ साली संस्थेत स्वतंत्र कलाविभागाची निर्मिती करण्यात आली.

सुरुवातीपासून आरोग्य, कला,  क्रीडा, साहित्य, विज्ञान, संगीत अशा सर्वांगीण विषयांना स्पर्श करणारे कार्यक्रम कला विभागातर्फेच सादर केले जात असत. परंतु जसा काळ पुढे सरकत गेला तसतसे वेगवेगळे स्वतंत्र विभाग अस्तित्वात आले व त्यानुसार कार्यक्रमांची विभागणी झाली. “पितृस्मृती व्याख्यानमाला” – समाजातील थोर पुरुषांच्या स्मृती जागविण्यासाठी १९९१ साली ही व्याख्यानमाला सुरु केली. विद्याधर गोखले, यशवंत पाठक, बाबासाहेब पुरंदरे, अरविंद इमानदार, वाय. जी. पवार, अशोक रानडे, अरुण टिकेकर, डॉ. जयसिंगराव पवार, द. वा. गोखले, कै. गोविंद पानसरे, डॉ. सदानंद मोरे आदि मान्यवरांनी व्याख्यानमालेमधे आपले वैचारिक योगदान दिले आहे. संस्थेचे माजी विश्वस्त श्री. भा. ल. महाबळ यांनी आपले पिता कै. लक्ष्मणराव महाबळ यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ भरघोस देणगी या व्याख्यानमालेसाठी दिली. पुढे हा उपक्रम ग्रंथालयातर्फे करण्यास सुरवात झाली. नाट्य, संगीत, सिनेमा आणि इतर कला ह्या विभागाच्या कक्षेत अजूनही जोमाने कार्यान्वित आहेत. अगदी थोडक्यात त्याचा आढावा असा मांडता येईल.



नाट्य विभागराज्य नाट्य स्पर्धेत गद्य व संगीत नाटके सादर करून नवीन कलाकारांना संधी.
संगीतशास्त्रीय संगीत, सुगम व नाट्यसंगीत कार्यक्रम, संगीत स्पर्धांचे आयोजन, दिवाळी पहाट, कोजागिरी, नवीन कलाकारांना संधी, रेडिओवरील थेट प्रक्षेपणाचे कार्यक्रम
चित्रकला हस्तकलाविविध प्रदर्शने
काव्यकवी संमेलने, स्पर्धा, काव्य मैफिली

एक कलाकार

एक संध्याकाळ

आपल्या उमेदीच्या काळात अंगभूत साहित्यिक, अभिनय, कला इ. च्या  माध्यमातून गाजविलेले व केवळ वय झाल्यामुळे प्रवासापासून वेगळे पडलेले किंवा कदाचित विस्मृतीत जात असलेल्या कलावंत साहित्यिकांना रसिकांपुढे सादर करून त्यांचा पत्रकाद्वारे यथोचित गौरव. कालांतराने हा उपक्रम काही कारणाने खंडित झाला.
प्रासंगिककलेचे वेगवेगळे आविष्कार सादर करणाऱ्या कलावंताना नेहमीच व्यासपीठ उपलब्ध.


२०२७ साली म्हणजे वर्षभरातच कला विभागाला पन्नास वर्ष पूर्ण होणार आहेत.

गेली पन्नास वर्षं मुलुंडच्या रसिक प्रेक्षकांना सतत काहीतरी नवीन, वेगळं आणि चांगलं देण्याचा प्रयत्न कलाविभागाने केला आहे. जाणते रसिक आणि उत्तम कलावंत यांची गाठभेट करण्यासाठीच या मंचाची निर्मिती केली आहे. बदलत्या परिस्थितीनुसार आणि अभिव्यक्तीच्या निरनिराळया माध्यमांचा उपयोग करून इथे असे अनेक सादरीकरणाचे प्रयोग झाले जे पहायला मिळणं एरवी सामान्य रसिक प्रेक्षकांना अप्राप्य झालं असतं. “सिनेमा ऑन बेंच” ह्या उपक्रमामुळे इथे जागतिक सिनेमा बघणे व त्यावर सिनेरसिकांना चर्चा व अभ्यास करता येत आहे. उत्तम सिनेमा, नाटक किंवा चित्रपट म्हणजे काय ह्याची अनेक रसास्वाद शिबिरं आयोजित करण्यात येत असतात. शास्त्रीय संगीताच्या महफिली वेगवेगळ्या स्वरूपात करून रसिकांची अभिरुची संपन्न आणि प्रगल्भ करण्यासाठी वेगवेगळे प्रयोग करण्यात आले.

कला विभागातर्फे निव्वळ कलांचं सादरीकरणच केलं जात नाही तर काही नाटकं, एकांकिका व अभिवाचनाची निर्मितीही वेळोवेळी केली जाते. महाराष्ट्र राज्याच्या नाट्य स्पर्धेतही कलाविभागाने अनेकदा यशस्वी सहभाग घेतला आहे. 

ह्या कलाविभागातर्फे होणाऱे सादरीकरण, उपक्रम किंवा निर्मिती ह्या संदर्भात माहिती मिळवण्यासाठी चोखंदळ रसिकांनी सतत ह्या संकेतस्थळावर आमच्याशी संपर्कात रहावे. किंवा  महाराष्ट्र सेवा संघाचे हरित सभासदत्व घ्यावे याद्वारे सर्व कार्यक्रमांची माहिती वेळोवेळी इच्छुकांना मिळत राहील.

ह्या सभासदत्वासाठी कार्यालयाशी संपर्क साधावा.  

महाराष्ट्र सेवा संघ, मुलुंड

कला विभाग – कार्यकारिणी

महेंद्र तेरेदेसाई (अध्यक्ष)

सतीश पाटणकर (कार्यवाह)

सभासद – राजू वेंगुर्लेकर, सुनील नाईक, मुकुल ब्रह्मे