भारतीय संस्कृतीची पाळेमुळे शोधताना संस्कृत भाषा व संस्कृत ग्रंथांचा अभ्यास अपरिहार्य आहे. कारण मानवी जीवनाशी निगडीत अनेक पैलू संस्कृत साहित्यात समर्थपणे मांडले गेले आहेत. महाराष्ट्र सेवा संघाचा संस्कृत विभाग विद्यार्थी व रसिकांमध्ये याची जाणीव निर्माण करून अभ्यासाच्या कक्षा रुंदावण्याचे कार्य गेली अनेक वर्षे अव्याहतपणे करत आहे.
इ.स.१९७७ मध्ये मृच्छकटिक नाटकातील एक प्रसंग सादर करण्याच्या निमित्ताने कै. राम बापट यांचे हस्ते संस्कृतचे कार्य महाराष्ट्र सेवा संघात सुरु झाले. १९८५ सालापासून मात्र ही धुरा पं. प्रभाकर भातखंडे यांनी आपल्या खांद्यावर पेलून धरली. ‘नाट्यम भिन्नारुचेजनस्य बहुधाप्यक समाराधनम’ या वाक्याप्रमाणे दरवर्षी राज्य नाट्य स्पर्धेत संस्कृत नाटक सादर करता करता संस्कृत भाषेची गोडी कलाकारांच्या व रसिकांच्या मनात निर्माण झाली. त्यातूनच संस्कृत भाषा संवर्धनाचे विविध उपक्रम महाराष्ट्र सेवा संघात सुरु झाले.
दि. १७ ऑगस्ट १९८५ पासून संस्कृत रसास्वाद वर्ग सुरु झाला. संस्कृत भाषेतील उत्तमोत्तम ग्रंथ संपदा मुलं व सामान्य रसिकांपर्यंत जावी आणि त्यातील सौंदर्याचा पुरेपूर आस्वाद घेता यावा यासाठी संस्कृत पं. प्रभाकर भातखंडे वयाच्या ८५ व्या वर्षीही प्रयत्नशील आहेत. शब्दांच्या व्युत्पत्तीवर भर देऊन साहित्यातील मूळ अर्थ आकलन करण्याचा प्रयत्न या वर्गात केला जातो. सुभाषिते, स्तोत्रे, वेद, व्याकरण, भक्तीवाड्मय, काव्य, इतिहास, नाटके, रामायण, महाभारत, जातक कथा, इ. अनेकविध विषयांचा या वर्गात अभ्यास करण्यात आला. पातंजल योगदर्शनासारखा गहन विषयही सर्वाना समजेल अशा पद्धतीने पं. भातखंडे यांनी ३७ वर्षे शिकवला. आता मात्र संस्कृत रसास्वाद वर्गाची धुरा, संस्थेचे अध्यक्ष श्री. चंद्रशेखर वझे यांनी दि. ५ जून २०२३ पासून समर्थपणे सांभाळली असून, दर गुरुवारी होणाऱ्या संस्कृत रसास्वाद वर्गाला श्रोत्यांचा उत्तम प्रतिसाद मिळतो.
जेव्हा शाळा व महाविद्यालये वगळता संस्कृत भाषेच्या अध्ययनाची सोय कुठेही उपलब्ध नव्हती तेव्हा संस्कृत भाषा संस्था, मुंबई या संस्थेने ‘केवळ ७२ तासात संस्कृत’ सारख्या आकर्षक पद्धतीने संस्कृत भाषा शिकवण्याचे वर्ग, त्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कै. ग. वा. करंदीकर यांच्या सहाय्याने महाराष्ट्र सेवा संघाने अनेक वर्षे चालवले.
संस्कृत भाषेत संभाषण करता करता भाषा शिकता यावी यासाठी अनेक संस्कृत संभाषण शिबिरे संस्कृत विभागाने आयोजित केली आहेत. संस्कृत भाषेच्या विविध अंगांची रसिकांना व अभ्यासकांना ओळख व्हावी यासाठी अनेक विद्वान व मान्यवरांची व्याख्याने संस्कृत विभाग आयोजित करतो. वानगीदाखल सांगताना ‘यज्ञ व यज्ञाची पद्धत याविषयी जिज्ञासूंचे समाधान होईल असे डॉ. भाग्यलता पाटसकर यांचे व्याखान, डॉ. सीमा सोनटक्के यांचे ‘मेघदूतातील सौंदर्यस्थळे’ उलगडून दाखवणारे रंजक भाषण, पं. भातखंडे यांचे ‘गीता व योग यातील साम्यस्थळे’ यावरील विवेचन असे विविध विषय येथे रसिकांपर्यंत नेले आहेत.
महाराष्ट्र सेवा संघातर्फे गेली आठ वर्ष संस्कृत भाषा प्रसार पुरस्कार दिला जातो. स्व. अुदधवराव. त्रि. आठले यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा हा पुरस्कार आत्तापर्यन्त श्री. आत्माराम उमर्ये, श्री. अविनाश गोहाड, डॉ. अनिल गौरीशेट्टी, सौ. माधुरी कुलकर्णी यासारख्या उमेदीने संस्कृत भाषा प्रसाराचे काम करणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार दिला गेला आहे.
“संस्कृत नाटक” हा तर संस्कृत विभागाचा पायाच. महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेत, १९७७ पासून शाकुंतल, मृच्छकटिक, रत्नावती, मुद्राराक्षस यासारखी अनेक संस्कृत नाटके सादर करता करता, पं. भातखंडे यांनी स्वत: नाटयलेखनाला सुरुवात केली. १९८८ मध्ये त्यांनी लिहिलेल्या ‘वृक्षरक्षणम’ या नाटकापासून दरवर्षी नवीन नाटक राज्य नाट्य़स्पर्धेसाठी सादर केले जाते. करमणूकीतून काहीतरी संदेश समाजापर्यंत पोहोचावा यासाठी आम्ही प्रयत्नशील असून पर्यावरणरक्षण, रक्तदान यासारख्या नाटकाबरोबरच, प्रहसने (फार्स) बालनाट्ये, पुरुषपात्र विरहित नाटक, द्विपात्री नाटक इतकेच नव्हे तर तमाशा, चर्चानाट्य, विस्मयनाट्य असे सर्व प्रकार संस्कृत विभागाने यशस्वीपणे सादर केले आहेत. यासाठी नाटकांना प्रथम, द्वितीय, तृतीय पारितोषिके तर मिळाली आहेतच, पण अनेक कलावंताना अभिनयाची पारितोषिकेही मिळालेली आहेत. इतकी की आता त्यांची गणना करणे थांबवावे लागले आहे!!
पं. प्रभाकर भातखंडे यांनी लिहिलेल्या नाटकांची आणि इतर विषयांची पुस्तके महाराष्ट्र सेवा संघाने प्रकाशितही केली आहेत. लोकप्रियतेमुळे या पुस्तकांची पुन्हा आवृत्ती काढावी लागली. त्यातील एक पुस्तक ‘मुक्ता’ चा मुंबई विद्यापीठाने अभ्यासक्रमात समावेशही केला आहे.
संस्कृत विभागाच्या प्रगतीमध्ये महाराष्ट्र सेवा संघाचे विश्वस्त, पदाधिकारी व असंख्य स्वयंसेवी कार्यकर्ते यांचे मोलाचे योगदान आहे. संस्कृतप्रेमी रसिकांना अधिकाधिक संधी व सोयी उपलब्ध करण्यासाठी संस्कृत विभाग सदैव कार्यरत होता, आहे व असेल हाच आमचा प्रयत्न आहे.
श्री. प्रसाद गोडसे (अध्यक्ष)
श्रीमती. सुमेधा नवाथे (कार्यवाह)