(विज्ञान प्रेमींचा मंच)
विज्ञान कथाकार आणि साहित्यिक श्री. निरंजन घाटे ह्यांना जानेवारी २०१४ मध्ये सु. ल. गद्रे साहित्यिक पुरस्कार देण्यात आला. ह्या निमित्तानेच; अध्यक्ष श्री. चंद्रशेखर वझे ह्यांच्या प्रेरणेने महाराष्ट्र सेवा संघाचा स्वतंत्र विज्ञान विभाग सुरु झाला आणि बघता बघता विज्ञान विभागाने अनेक अनोखे कार्यक्रम सादर केले. तरुण कार्यकर्ते जोडले गेल्यामुळे एक नवचैतन्य आले आणि विज्ञान- तंत्रज्ञानाशी संबंधित वेगवेगळ्या विषयांवर व्याख्याते कार्यशाळा, सादरीकरण, स्पर्धा, प्रयोग असे अनेक उपक्रम राबवले.
विज्ञान-तंत्रज्ञान हे आजच्या आयुष्याचा इतका अविभाज्य भाग झाला आहे की लहान थोरांना त्याच्या जाणीवपूर्वक वापरासाठी जितकं प्रबोधित करता येईल तितकं हवंच आहे. हा दृष्टीकोन ठेवून मूलभूत गणित-विज्ञानापासून अगदी रोजच्या वापरातील स्मार्ट फोन सारखे तंत्रज्ञानापर्यंतचे विषय ह्या विभागाने हाताळले. आरोग्य, संगीत, भाषा, साहित्य, स्थापत्य, तांत्रिक उपकरणी, कृषी, उर्जा व्यवस्थापन, पर्यावरण, खगोलशास्त्र अशा रोजच्या जगण्यापासून ते कल्पनेपलिकडच्या विश्वापर्यंत सर्वव्यापी असलेल्या अशा विज्ञानाचे भांडार विज्ञान प्रेमींपर्यंत पोचवणे आणि ह्या प्रक्रियेत आपणही अधिक सुजाण व व्यापक होणे हे विभागाचे ध्येय आहे.
२८ फेब्रुवारी हा राष्ट्रीय विज्ञान दिन ह्या विभागाने अनेक वर्षे वेगवेगळ्या पद्धतींनी साजरा केला. शालेय विद्यार्थी आणि त्यांचे विज्ञान शिक्षक यांना सहभागी करून घेऊन प्रयोगांची प्रात्याक्षिके, स्पर्धा खेळातून विज्ञान शिक्षण, वाद -विवाद कौशल्य स्पर्धा, रंजनातून विज्ञानाचा प्रसार असे अतिशय समर्पक कार्यक्रम करून विज्ञानाचे महत्त्व उद्याच्या तरुणाईमध्ये बिंबवण्यासाठी उत्तम काम केले आहे. विज्ञानाचे, तर्कबुद्धीचे मुख्य आश्रय स्थान असलेल्या डाव्या मेंदूला प्राधान्य देणारे चिन्ह विभागाचे बोधचिन्ह म्हणून ठरवण्यात आले.
- ७ जुलै २०१८: अंटार्क्टिका हा दक्षिण ध्रुवावरचा गुढरम्य प्रदेश अलगद उलगडून दाखवणारा डॉ. मधुबाला जोशी चिंचाळकर ह्यांचा अदभूत कार्यक्रम
- २४ नोवेंबर २०१८ : जागतिक विज्ञान दिवस ( ८ नोवेंबर) युनेस्कोने पुढाकार घेऊन जाहीर केलेला हा दिवस विज्ञानाशी संबंधित अनेक विषयांवर वाद-विवाद आणि निबंध स्पर्धा ह्या स्वरुपात साजरा केला, मुलांचा सहभाग वाखाणण्याजोगा लाभला.
- २ मार्च २०१९ : राष्ट्रीय विज्ञान दिन (२८ फेब्रुवारी) – विमान कसं उडतं व त्याचं नियंत्रण कसं केलं जातं ह्या व अशा अनेक तांत्रिक गोष्टींचं मार्गदर्शन. शिवाय विद्यार्थ्यांना सिम्युलेटर वर विमान उडवण्याची संधी, तसेच रोख बक्षिसाने सन्मान. श्री. शशिकांत कोप्पीकर ह्या निवृत्त विंग कमांडर सरांनी हवाईदल व एकूणच संरक्षणदले व तेथील करियरच्या अतिशय अभिमानास्पद अशा संधींविषयी मोलाचं मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांना विचारप्रवण केलं.
अशाच प्रकारे विज्ञान दिन साजरा करणे आणि अनेक विषयांवर विज्ञानाच्या अंगाने प्रबोधन करणे असे अनेक कार्यक्रम विभाग करत आहे. ह्या व्यतिरिक्त विज्ञानविभागाचे तरुण कार्यकर्ते आणि खास ह्या उद्देशाने जोडून घेतलेले प्रशिक्षणार्थी स्वयंसेवक अशा एकूण ८ जणांच्या चमूने संस्थेची पहिली इंटरॅक्टिव स्वरूपाची वेबसाईट बनवण्याचे काम २०१७-२०१९ मधे यशस्वी रित्या केले. ह्यापुढेही तरुण कार्यकर्ते आणि सभासद मिळवून विभागाचे काम जोमाने चालू रहावे ह्यासाठी संस्था प्रयत्नशील आहे.
श्री सतीश पाटणकर (अध्यक्ष)
श्री अर्चित गोखले (कार्यवाह)